Thursday, 6 June 2019

तू फक्त दे...

शब्द म्हणतो सुर दे
तालाला या नुर दे
सागराला तीर दे
नावेला पैलतीर दे

उडता येण्या पंख दे
चालण्यास जमिन दे
वाहता मंद वारा दे
झुळझुळता झरा दे

रोज नवे आव्हान दे
लढण्या मज बळ दे
नित्य नवी उमेद दे
साजरी ती जित दे

Thursday, 30 May 2019

जन्मांतरीचे नाते

तुझ्या माझ्यातला एक धागा
नाही बांधला तो या युगा
किती जन्म झाले आजवर
तरी नाही तुला त्याची कदर
ओळखले मी जरी तुजला
गतजन्माची तू खूण विसरला
जन्मांमागून जन्म चालले
कर्माचे हे भोग ना सरले
तुटूनही ना जे अजूनी तुटले
जन्मांतरीचे नाते आपले
कितिदा नव्याने जन्मा यावे
कितिदा हे अंतर मिटवावे
समजून घेता खरं कारण
भेट ना आपली निष्कारण
उमजून घे हा धडा यातनांचा
यातूनच जातो मार्ग मोक्षाचा
पुर्वजन्माचे कर्ज संपता
कहानीची या होईल सांगता 

Saturday, 24 March 2018

ओ वुमनिया...

नुकताच जागतिक महिला दिवस साजरा झाला. सगळीकडे कौतुक आणि अभिनंदानाचा वर्षाव चालला होता महिलांवर... त्याच वेळी या दिवसाबद्दल जोक्ससुद्धा सोशल मिडीयावर प्रसिद्ध झाले... याच गदारोळात फेसबुकवर एक विडीओ पहिला... काही महिलांनी काही प्रश्न उपस्थित करत जागतिक महिला दिवसावर बहिष्कार घालण्याचे आव्हान करत असल्याचे...

त्यांनी मांडलेले प्रश्न कितीही खरे असले तरी माझ्या मनाला मी स्वत: एक स्त्री असूनही काही भिडले नाहीत. मुळात स्त्री ही गरीब, बिचारी, अबला आहे असे जे चित्र समाजात रंगवले जाते तेच मला पटत नाही. स्त्री ही आदिशक्तीचा अंश... मग ती अबला असूच शकत नाही... पण आपल्याकडे बहुमतात जर लोकं एखादे मत प्रदशीत करत असतील तर तेच अंतिम सत्य समजले जाते... स्त्री हि सबला आहे पण ती स्वतःच स्वत:ला आणि इतर स्त्रियांना कमी लेखत राहते... मग लहानपणापासूनचे संस्कारांचे ओझे बाळगत एखादा न्यूनगंड ठेवून सर्वच महिलांना कमी लेखू लागते. यात दोष तिचाही नाही. बहुमतात त्यांच्या मनावर जे बिबंवले जाते तेच त्याचे सत्य, आचारसरणी बनते.

पूर्वीच्या काळी घरचे कामे स्त्रिया आणि बाहेरची कामे पुरुष अशी विभागणी असे. पण तेव्हाही स्त्री-पुरुष समानता होती. स्त्रिया नुसत्या चूल आणिमुल यात अडकल्या नव्हत्या. नाहीतर तुम्हीच सांगा झाशीची राणी, रझिया सुलतान, अहिल्याबाई होळकर यांना युद्धकला आणि राज्यकला अवगत असती का? पण जसजसा काळ पुढे सरकू लागला तसा कधी एका स्त्रीनेच तर कधी पुरुषी अहंकाराने स्त्रियांना पुढे जाण्यापासून अडवले. अन मग स्त्रियाच स्वत:ला कमी लेखू लागल्या. चुकीच्या पायंडे पडत असताना साधा विरोध करायला सुद्धा पुढे आल्या नाहीत. का? तर हीच रीत आहे म्हणून... जर तुम्ही स्वत:च स्वत:साठी उभे रहात नाही तर मग दुसरे तर का येतील?

काळ बदलला अन् पुरुषाच्या बरोबरीने बायकाही बाहेर पडल्या. काही संसाराचा गाडा चालवण्यासाठी तर काही कर्तुत्व, काही तर करून दाखविण्यासाठी. पण हे करत असतानाही घरातील कामे हि फक्त माझी एकटीची जबाबदारी आहे अशी भावना मनातून काही गेली नाही. आणि या भावनेतूनच आले कर्तव्य. मला नेहमीच वाटते की कुठलेही काम करताना कर्तव्याची भावना नको कारण जर तुम्ही मनापासून जर ती गोष्ट केलीत तर आणि तरच त्यात प्रेम उतरेल पण फक्त कर्तव्य म्हणून केलेत तर ते तुम्ही जबरदस्तीने कराल. आणि मग त्याला काहीच अर्थ रहात नाही. मनापासून जर करत असाल तर तुम्हाला कधीच ती कामे करायचा तणाव जाणवणार नाही. कर्तव्याने तणावात वाढच होईल.

खरे तर स्त्री-पुरुष दोघे नोकरी करत असतील तर घरातील कामे ही अतिरिक्त कामे होतात. मग ही अतिरिक्त कामेही दोघांनी वाटून घ्यावीत. तसे करणे जर शक्य होत नसेल तर मग ती कामे दुस-याकडून करून घ्यावीत. थोडे पैसे जातील पण तुमचा वेळ तुम्हाला आवडतील अश्या गोष्टी करण्यासाठी, तुमच्या माणसांना देता येईल की. उगाच ‘सुपरवूमन’ बनण्याचा अट्टाहास नको. कारण त्यामुळे तुमचे मन स्वस्थ राहणार नाही आणि त्यामुळे घरातील इतरांचेही. काही काही जणींचे स्वयंपाक करणे हा एक छंद असतो. तो केल्याने त्यांचा तणाव कमी होतो. मग करा कि बिनधास्त स्वयंपाक. आपल्या माणसाच्या चेह-यावर आपण केलेला पदार्थ खाल्यानंतर येणारे समाधान पाहणे हाही एक आनंदाचा क्षण असतोच की... थोडक्यात काय स्त्रियांनी स्वत:ला जे आवडते तेच करावे. जे आवडत नाही ते स्पष्टपणे सांगावे आणि ते न करण्याचा मार्गही शोधून काढावा. एक स्त्री आनंदी असली की मग घरही आनंदी होते. चिडचिड, वाद करण्यात स्वत:ची आणि इतरांची शक्ती फुकट घालवण्यात काय अर्थ आहे.

दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आपण स्त्रिया आपल्या त्यागाचे फारच गुणगान करून लोकांची सहानुभूती मिळवत असतो. ते टाळले पाहिजे. मुळात आपण स्त्रिया भावना व्यक्त करण्यात खूपच सराईत असतो. पुरुषांचे तसे नसते. पण त्यामुळे ते काही भावनाहीन होत नाहीत. आई खस्ता खावून मोठे करते तर बाबा तुटकी चप्पल पुनःपुन्हा शिवून वापरत आपले हट्ट पुरवतात. बहिण भावासाठी कितीतरी कामे करते आणि तोच भाऊ तिच्यासाठी कधी खाऊ तर कधी स्वत:ची आवडती वस्तूही तिला देवून टाकतो. गरोदर असताना आणि नंतरही आपण बाळामुळे आपले करिअरमध्ये ब्रेक आला म्हणून हळहळतो. खरे तर बाळाला जशी आपली गरज असते तशीच आपल्यालाही विश्रांतीची गरज असते हे सोयीस्कररित्या विसरतो. स्त्री जेव्हा लहान बाळाला सोडून नोकरीस गेली की केवढा मोठा त्याग करतोय असे वाटते ना? पण समजा एखादा पुरुष नोकरीनिमित्ताने आपले घर, माणसे सोडून परदेशी जातो तेव्हा आपण काय बोलतो? व्वा काय मस्त संधी मिळाली याला नोकरीत. का? त्याला भावना नाहीत? काहीच वाटत नसेल का त्याला असे जाताना? पण तरीही घरातील लोकांचा आर्थिक ताण कमी करण्यासाठी तो जातो. हा त्याचा त्यागच नाही का? मग जर स्त्री-पुरुष दोघेही त्याग करत असतील तर मग आपणच आपल्या त्यागाचे भांडवल का करावं? तुम्हीच विचार करून ठरवा.

स्त्री-पुरुषांना देवाने काही दैवी देणग्या दिल्या आहेत ज्या एकाकडे आहेत तर दुस-याकडे नाहीत. याला एकच कारण ते असे की दोघे एकमेकांना पूरक असावेत. मग आपण हा क्षेष्ठ ही क्षेष्ठ असा वाद घालवण्यात वेळ दवडणे कितपत योग्य आहे. दोघेही आपल्याआपल्या जागी योग्यच आहेत. फरक असतो तो त्यांच्यावर झालेल्या संस्कारांचा. या संस्कारानुसारच त्यांचे वर्तन असते.

शेवटी इतकेच सांगीन ‘सुपरवुमन’ किंवा सर्वश्रेष्ठ न बनता फक्त माणूस बनून जगा. चुका, त्यातून शिका पण मुक्तपणे जगा.  उगाच perfect बनण्याचा अट्टाहास नको. Sometimes it’s perfectly okay to be imperfect.

Saturday, 3 March 2018

हरीशचंद्रगडाच्या निमित्ताने...

हरीशचंद्रगड, गिर्यारोहकांची पंढरी... खरे तर मी trekking म्हणजे गिर्यारोहण क्षेत्रात येण्याचे एकमेव कारण... माझा पहिला ट्रेक खर तर सरसगड... पण एका दिवसाच्या त्या ट्रेकच्या छान अनुभवानंतर दोन दिवसांचा वस्तीचा ट्रेक त्याच लोकांसोबत म्हणजे गिरीविहंगसोबत करायचे ठरवलं... खरे तेव्हा मला वाटले हि नव्हते कि मी गिर्यारोहण पुढे कायम स्वरूपी करतच राहीन... साधलेघाट ते हरीशचंद्रगड असा तो ट्रेक...

आदल्यादिवशी रात्री बोरोवलीहून बस पकडली. आम्ही साधारण ३५-४० जण होतो. मस्त गप्पा, अंताक्षरी म्हणत प्रवास चालू होता... जसजशी रात्र सरत होती तसे हळूहळू सगळे झोपेच्या आधीन होऊ लागले. मला मात्र प्रवासात झोप येत नसल्याने जागी राहून बाहेरच्या अंधाराची आणि पाळणाऱ्या झाडांची मजा घेत होते.  साधारण पहाटे ४:३०- ५ च्या सुमारास आम्ही साधलेघाटात पोहचलो. बस तिथेच सोडून आम्ही अंधारातच घाट उतरायला सुरुवात केली. थोडसं अंतर चालल्यावर एक शाळा दिसली. तिथे आम्ही थांबलो चहा व नाश्ता करण्यसाठी.

नाश्ता आणि सकाळीची कामे आवरून आम्ही पुन्हा चालायला सुरुवात केली. सरसगडला आलेले अमित शिंदे, अमित शिर्सेकर, राजेश जाधव, सचिन राऊत, साधना madam यांच्याशी गप्पा मारत चालणे चालू होते. पण जसजसं ऊन वाढू लागलं तसतशी माझी battery उतरायला लागली. एक तर उनाची सवय नाही, दुसरे पहिलाच वस्तीचा ट्रेक तर सामान खूप सारे घेतलेले. इतकं सामान घेवून उनात चालायचं जीवावर येत होत अगदी. त्यात झोप नव्हती झालेली त्यामुळे भर म्हणून पित्त उसळलेले. पण सांगणार कोणाला... सगळ्यांची नवीनच मैत्री झालेली... मग काय चलते राहो...  सभोवती उंच सह्याद्रीच्या रांगा... वेगवेगळ्या आकाराचे डोंगर... मध्येमध्ये निलेशदा त्यांची नावं सांगत होता खरा... पण त्याच्याकडे लक्ष देण्यापेक्षा माझी कडेकपारीचे फोटो काढणे चालू होते... माझ्यासाठी हा एकदम नविन अनुभव होता... एरव्ही गाडीतून प्रवास करताना सहयाद्री पाहिलेला... चालत रमत गमत इतक्या जवळून सह्याद्रीला पाहण्याचा अनुभव काही न्याराच होता.

दुपारचे जेवण एका सावलीच्या ठिकाणी केले. ऊनाचा जोर आता वाढू लागला होता. आणि त्यामुळे माझा वेग ही कमी होऊ लागला. सामान घेवून चालणे मला जमत नाही हे अमित शिंदेच्या लक्षात आले. त्याने माझे थोडे सामान त्याच्याकडे घेतले. पण हे ऊन... त्याचे काय... पहाटेपासून चालतोय या डोंगररंगातून आणि अजून किती चालायचे ते हि ठावूक नाहीये... का हि लोक इतकी पायपीट करतात असा विचार सारखा मनात येत होता.

मजल दर मजल करून आम्ही शेवटीसवा दुपारी ४ ला पाचनई गावात पोहचलो. तिथे भगवानदादाने आमचे स्वागत केले. छान शेणाने सावरलेले घर. . हुश चला आलो एकदाचे मुकामाच्या ठिकाणी. पण बंटीने सांगितलं कि इथे चहा घेवून गडावर जायचे आहे. आजचा मुक्काम गडावर आहे. माझे तर त्राणच गेले ऐकून. मी विचारले “अजून किती चालावे लागेल?” माझा अवतार पाहून सचिनने म्हटले “फक्त अर्धा तास अजून”

चहा घेतला अन मग मला उलट्या होऊ लागल्या. जागरण, पित्त आणि ऊनाचा त्रास एकदम बाहेर पडले. पण मला थोडे बरे वाटू लागलं. एव्हाना ऊनही कमी झाले होते. आम्ही गडावर जाण्यास सुरुवात केली. थंड हवा असल्याने गड चढण्यास तितकासा त्रास झाला नव्हता. गडावर पोहचायला साधारण ६ वाजले असावेत. आम्ही गणेश गुहेत सामान टाकले आणि धावत कोकणकड्याकडे निघालो...

मला कळत नव्हते कि सगळे इतकी घाई का करत आहेत ते. साधना madam म्हणाल्या “ ते तुला कड्यावर गेल्यावर कळेल”. आम्ही कोकण कड्यावर पोहचलो अन मी स्तब्धच झाले. सूर्यास्त होत होता.

सुर्याची सोनेरी किरणे डोंगरांवर पडून डोंगर सोनेरी झाले होते. एका कड्याला गणपतीमुखाचा आकार तर इतका विलोभनीय दिसत होता कि मी फक्त पाहतच राहोले. सोनेरी आकाश आणि त्यात रक्तवर्णीय गोल.

मग हळूहळू आकाश रंग बदलू लागलं. आधीचा सोनेरी रंग जावून निळाई आणि लाल रंगाच्या छटा येवू लागल्या. अवघ्या १५ मिनिटात निसर्ग आपले रंग बदलत होता. तिथे असलेले सगळे तल्लीन झाले होते ते सगळ पाहण्यात. आणि मला सतावणाऱ्या प्रश्नाचे उत्तर मिळाले. इतकी पायपीट करून काय मिळणार? दिवसभराचा थकवा कधीच पळून गेला होता. मी तर प्रेगात पडले त्या सगळ्याच वातावरणाला. असा निसर्ग पहायचा तर सहयाद्री तुला मी नेहमीच भेटायला येईन असा निर्धारच केला मी तेव्हा.

एव्हाना अंधार पडू लागला होता. आमची पाउले आता गुहेकडे वळली मनात अभूतपूर्व असा अनुभव घेवून. कोकणकड्याचे ते रूप आजही माझ्या मनातून जात नाही. रात्री इतर सगळे गप्पा मारत बसले पण मी मात्र लवकर झोपले. सकाळी उठल्यावर केदारेश्वराचे दर्शन घेवून तारामती आणि रोहिदासला भेटून आलो.

नंतर सुरु केला परतीचा प्रवास मनात अनेक आठवणी घेवून. खूप सारे शिकले मी या दोन दिवसात. इच्छाशक्ती असेल तर सगळे करता येते. स्पर्धा नेहमी स्वत:शी करावी. निसर्गाशिवाय दुसरा मोठा कलाकार नाही. आणि महत्त्वाचे ट्रेक करताना फक्त गरजेचे सामान घ्यायचे.


त्याच आठवणी पुन्हा जाग्या झाल्या आणि जवळजवळ १० वर्षांनी पुन्हा हरिश्चंद्रगडाला भेटायला जायचं ठरवलं. जणू गडही मला बोलवत होता. मी, आफरीन, समरीन, राजीव आणि अमेय असा पाच जणांचा प्लान केला. शेवटची कसारा लोकल पकडली. तिथे एका जीपवाला आधीच सांगितला होता. लोकल पोहचताच जीपमध्ये बसून पाचनई गाठले. गावात बराच बदल झालेला दिसला. जीपवाल्या काकांनी भगवानच्या घरी सोडलं. त्याचा घरी थोड्या वेळ झोप काढली. सकाळी नाश्ता करून ७:३० ला गडाकडे कूच केली. मन मात्र भगवान दादाच घराची खुण शोधात होते. शेवटी न राहवून एका आजीला भगवानदादाच्या घराचा पत्ता विचारला. भगवानदादाला भेटल्यावर त्याने लगेच ओळखले. तो चहाचा आग्रह करू लागला. त्याला येताना येतो सांगून पुढे निघालो.

साधारण दोन-अडीच तास चालल्यावर गडावर ११:३० ला पोहचलो. गडाचे रूप बदलेले दिसल. गडावर अनेक छोटी बाजारपेठ तयार झालेली दिसली. आणि आधी न पाहिलेला प्लास्टिककचराही. मन थोडं हळहळल. तुकाराम दादाकडे चहा घेतला आणि रात्रीच्या जेवणाबद्दल सांगितलं. नंतर गणेशगुहा गाठली. सगळेच थकले होते. म्हणून थोडा वेळ झोप काढून कोकणकड्यावर जायचे ठरवलं. मी आणि अमेय सोडून सगळे घोरू लागले. १:३० वाजता सगळ्यांना उठवलं. झोप झाल्याने सगळे ताजेतवाने झाले होते. अमेयच्या आईने छान जेवण दिले होते. त्यावर ताव मारला.

२:३० वाजले होते आणि कोकणकड्यावर ऊन असेल म्हणून तारामती आणि रोहिदास करून शिडीवाटेने कोकणकड्यावर जायचे ठरले. तारामतीला जाताना एक कुत्रा आमच्यासोबत आला. तो आमचा वाटाड्या झाला. अमेय त्याच्या मागे चालू लागला. कुत्रा मळलेली वाट सोडून कारवीच्या रानात शिरला. तसा मी अमेयला म्हटलं “अरे हि वाट नाही वाटत मला”. अमेय म्हणाला “अरे ये कुत्ता रोज आता है! उसे ज्यादा पता होगा ना. इसे ही follow करते है|” मग काय शिरलो कारवीच्या रानांत.

थोडा पुढे गेल्यावर सगळ्यांच्या लक्षात आले की आपण चुकीची वाट घेतलीय. पण आता काहीही पर्याय नव्हता. कधी climb करत तर कधी करवीशी झुंजत शेवटी तारामती सर केलाच. तारामती climb करणारे कदाचित आम्ही पहिलेच असावोत. तिथे छान फोटो काढून आम्ही आमचा मोर्चा रोहीदासाकडे वळविला. एव्ह्याना ४ वाजायला आले होते. रोहिदासच्या पाठराच्या कडेला कोकणकड्यावर जायला शिडी होती. पहिली शिडी बरोबर घेतली. ती उतल्यावर खुणां बघून रस्ता शोधू लागलो. आम्हाला दोन शिड्या आहेत हे माहित नव्हता. दुस-या शिडीच्या जवळ गेलो होतो. पण ती पाहता उजवीकडे वळलो. वाटले कि या छोटेखानी जंगलातून वाट असावी. आमच्यासोबत अजून एक पाच जणांचा गटही वाट भरकटला. दीड-दोन तास आम्ही जंगलात रस्ता शोधत भटकत होतो. आमच्या जवळचे पाणी संपले होते आणि दोन तासात पोहचणार म्हणून खाण्यासाठी काहीच नाही घेतलेले सोबत. ५:३० वाजले तसा माझा जीव कोकणकड्यासाठी तुटू लागला. वाट काही केल्या सापडत नव्हती. शेवटी पहिल्या शिडीजवळ जावून पुन्हा सरुवात करायचे ठरवले. शिडीजवळ पोहचलो तर अजून एक trekkersचा गट आला. त्यांनी सांगितलं की अजून एक शिडी आहे ती उतरली कोकणकड्यावर जाता येते. आम्ही त्याच्या मागे शिडी उतरून कोकणकड्याकडे निघालो.

कोकणकडावर पोहचताच माझ्या तोंडावर नकळत हसू आले. रस्ता हरवल्यावर आलेला ताण कुठच्या कुठे पळून गेला होता. कडाही मला विचारत होता “काय ग इतकी वर्षे लावलीस परत भेटायला?” कड्याची मनातल्या मनात क्षमा मागितली आणि वचन दिले “वर्षातून एकदा तरी येईन तुला भेटायला”. तोच कडा, तोच सूर्य आणि तेच रंगीबेरंगी आकाश... मनच भरत नव्हता...

अंधार पडू लागला तसा गुहेकडे वळलो. रात्रीचं जेवण करून, मस्त कॅम्प फायरचा कार्यक्रम केला. सकाळी केदारश्वर दर्शन करून परतीचा मार्ग धरला.

गड उतरल्यावर भगवानदादाकडे चहा घेत जुन्या आठवणी जाग्या केल्या. मग गडाच्या दिशेने सलाम करत लवकरच भेटू असे म्हणत हात हलवला...

Thursday, 25 January 2018

निर्णय...

निर्णय...
नेहा, एक सॉफ्टवेअर इंजिनीअर, नुकतीच नोकरीला लागलेली... अगदी सरळमार्गी पण खूप महत्त्वकांक्षी... आयुष्यात स्वतःच्या पायावर उभे राहायचं आणि बाबांचं नाव मोठ करायचं हेच तिचे एकमेव स्वप्न्न... आणि काहीही झाले तरी ते तिला पूर्ण करायचे होते... त्यासाठी ती खूप मेहनत करायलाही तयार होती.
एके दिवशी ऑफिसमध्ये असताना अचानक एक फोन येतो. “हेलो, मी विक्रांत... तुम्हाला लग्न करायचे आहे ना? मला तुमचा बायोडेटा हवा होता”. तिला एकदम धक्काच बसतो. कारण घरातही तसा काहीही बोलणे चालू आहे याची साधी कुणकुणही नसते आणि हे काय नवीनच. ती जरा वैतागूनच बोलते. “नाही मला नाही आताच लग्न करायचे... तुम्हाला कुणी दिला हा नंबर... आमच्या घरीही हा विषय अजून निघाला नाहीये...” तो लगेच बोलतो “अहो तुमच्या भावानेच दिलाय हा नंबर... तुम्ही please घरी बोलता का आधी? मी अर्धा तासात पुन्हा फोन करतो तुम्हाला...”  ती ठीक आहे असे बोलते.
लगेचच घरी फोन लावते... आणि घरच्यांना फैलावर घेते. “कुणाही अनोळखी वक्तीला तुम्ही माझा नंबर का दिलात? आणि लग्न हा विषय माझ्याशी न बोलता तुम्ही सुरु का केलात?” तिची आई तिला समजावते “अग, तुला काही आम्ही जब्बरदस्तीने नाही करत. हे स्थळ आलेय आणि त्याने तुमचा नेट कि काय म्हणतात तिथे बायोडेटा पाठवायला सांगितलं. ते काही आम्हाला कळलं नाही म्हणून तुझा नंबर दिला. बाकी काही नाही. फक्त बोलून तर घे”
थोड्या वेळाने विक्रांतचा पुन्हा फोन आला. नेहाने अगदी स्पष्टपणे सांगितलं कि तिला आताच लग्न वैगेरे नाही करायचं. तिला पूर्णतः तिच्या करिअरवरच लक्ष केंद्रित करायचे आहे. तोही लगेच म्हणाला “मलाही नाही करायचे लग्न. मीही सॉफ्टवेअर इंजिनीअर आहे.  माझंही पाहिलं लक्ष करिअर हेच आहे. माझ्या घरच्यांनी जब्बरदस्तीने मला फोन करायला सांगितलं. म्हणून मी तुम्हाला फोन केला.”  
चला तर मग आता हा विषय इथेच संपला म्हणून तिने सुटकेचा नि:श्वास टाकला.
त्या दिवशी घरी गेल्यावर आई-बाबांना तिने समजावलं. अन अजून काही वर्षे थांबण्यास सांगितलं. आई-बाबा सुद्धा तयार झाले या गोष्टीला.
ती मग तिच्या ऑफिसमध्ये छान रमली. कसलच टेंशन उरला नव्हत... पूर्ण लक्ष कामावर होत तिचे... या घटनेला साधारण दोन-तीन महिने उलटून गेले असतील. अन पुन्हा त्याचा फोन आला. ती जरा वैतागलीच होती का पुन्हा फोन करतोय म्हणून. पण त्याने लग्नाचा विषय काढला नाही. त्याचं असेच करिअर आणि पुढचे करिअरचे प्लानिंग यावरच बोलणे झाले. ती मनात म्हणाली “जाऊ देत हा जोवर लग्नाचं बोलत नाही तोवर ठीक आहे. नाही तर आपण बोलणंच थांबवू”
असेच त्यांचे दर तीन-चार महिन्याने फोनवर बोलणे व्हायचे. पण त्यांनी कधीच वैयक्तिक गप्पा मारल्या नाहीत. त्यांचा विषय एकच करिअर आणि फक्त करिअर.
असे करता करता तीन-चार वर्षे गेली. तिला परदेशात कामानिमित्त जाण्याचा योग आला. ती परदेशात साधारण पाच-सहा महिने राहिली असेल. भारतात परत आल्यावर तिचा दिनक्रम ठरला होता. ऑफिस, मित्रमैत्रिणी आणि घर. सगळा कसे मस्त चालू होते.
आता तिच्या घरी पुन्हा तिच्या विषय निघाला. नोकरीत तीही स्थिरावली होती त्यामुळे तिचीही काही हरकत नव्हती. तसा तिने आई-बाबांना सांगितलंही. एव्हाना तिनेही तिच्या भावी जोडीदार कसा हवा हे मनाशी ठरवला होते. तिच्याच क्षेत्रातला, मनमिळाऊ, तिला सर्वोतोपयी मदत आणि एकसमान वागणूक देणारा. तिचा मित्र परिवार मोठा तसाच त्याचाही असावा म्हणजे दोघाचे मिळून खूप मित्र अन खूप सारी मजा करता येईल. ती एकत्र कुटुंबात मोठी झालेली तर त्याचेही तसेच कुटुंब असावे. अश्या अगदी साध्या तिच्या अपेक्षा होत्या जोडीदाराविषयी...
भारतात आल्यावर एका महिन्याने पुन्हा विक्रांतचा फोन आला. या वेळी जरा तो घाबरलेला वाटत होता. त्याने विचारलं “मी फोन करत होतो तुम्हाला. पण तुमचा फोन लागतच नव्हता. फोन दोनच कारणाने लागत नाही. एक तर नंबर बदलला तर आणि दुसरा म्हणजे...” आणि तो गप्प झाला. तिने हसतच विचारले “दुसरे म्हणजे काय हो?” तो म्हणाला “दुसरे म्हणजे लग्न झाले असेल तर...” त्यावर ती उत्तरली “ही दोन्ही कारणे नाहीत माझा फोन बंद असण्याची. मी ऑफिसच्या कामानिमित्त परदेशी गेले होते. मागच्या महिन्यात परत आलेय.” असे बोलून दोघे पुन्हा त्यांच्या नेहमीच्या विषयावर बोलले आणि नंतर फोन ठेवून दिला.
फोन ठेवल्यावर थोड्या वेळाने त्याने पुन्हा फोन केला. “हेलो विक्रांत बोलतोय. मला तुम्हाला एक विचारयचे होते.”
तिने लगेच विचारले “काय?
त्यावर तो बोलला “मी तुमच्या घरी पाहुणा बनून कधी येवू?
“अहो कधीही या”. खरे तर तिला त्याच्या प्रश्र्नचा रोख कळला नव्हता.
त्याने पुन्हा विचारले “मी कधी येवू तुमच्याकडे पाहुणा बनून? चहा पोह्याच्या कार्यक्रमासाठी?
तेव्हा कुठे तिला त्याच्या प्रश्न लक्षात आला. “अहो तसं होय. मी घरी बोलते अन सांगते तुम्हाला”
फोन ठेवल्यावर ती विचार करू लागते. बापरे एवढ्या साठी हा इतके वर्षे बोलत होता आपल्याशी? माझ्या कधीच का नाही लक्षात आले. जाऊ देत ना काय फरक पडतो. नाहीतरी कुणाशी तरी करायचेय लग्न. कुणा अनोळखी व्यक्तीपेक्षा हा बरा. तसाही माझ्याच क्षेत्रातला आहे आणि नात्यातालाही. आपल्या अपेक्षामध्येही बसतोय. पण आता हे घरी कसे सांगायचे? घरी तर कधीच नाही सांगितलं आपण कि आम्ही बोलतो ते. कारण या दृष्टीने आपण कधीच विचार केलेला नव्हता आणि म्हणून घरी सांगायची तशी काहीच गरज नाही वाटली. बघू मावशीने आणलं होते हे स्थळ तर तेच पुन्हा बघायला सांगू असे म्हणून ती पुन्हा आपल्या कामाला लागते.
दोन-तीन दिवसांनी ती विचार करते कि याला कशाला बोलवयचे घरी. दोघे कुठेतरी आधी बाहेर भेटू. आणि दोघे एकमेकांना आवडलो तर घरी सांगू. पण विक्रांतला संपर्क कसा करायचा? कारण त्याचा नंबरच तिच्याकडे नव्हता. तोच नेहमी फोन करायचा आणि तिला कधी त्याला फोन करावे असे वाटलेच नव्हता. म्हणजे आता तो जोवर फोन करत नाही तोवर थांबावे लागणार.
दोन आठवड्याने त्याचा फोन आला तेव्हा तिने त्याला आपण आधी भेटूयात. जर दोघे एकमेकांना आवडलो तर घरी सांगू असे म्हटले. तो ही तयार झाला त्या गोष्टीला. मग एका दिवशी ठरवून ते सकाळच्या नास्तासाठी भेटले. भेटल्यावर ठीकठाक वाटला तिला तो. फारसे बोलले नाहीत ते थोडे अवघडले असल्यामुळे. त्यालाही ती आवडत होतीच. तिचा शांत आवाज ऐकून त्याचे टेंशन जात असे आणि म्हणूनच तो इतके वर्ष तिला फोन करत होता असे त्याने तिला सांगितले. त्याच्या घरी तो धरून तीन भाऊ. हा सगळ्यात मोठा आणि एकटाच नोकरी करणारा. दोघे भाऊ अजून शिकत होते. आई-बाबा शेतकरी. त्याने त्याचे शिक्षण मामाकडे राहून पूर्ण केलेले. सध्याही राहायला मामाकडेच होता. पण लवकरच घर घेणार होता. आता मी माझ्या घरी सांगतो असे म्हणून विक्रांतने नेहाचा निरोप घेतला.
मग ती ऑफिसला गेली. ऑफिसमध्ये फक्त एका मैत्रिणीला तिने हि गोष्ट सांगितली होती. तिची मैत्रीण तिला म्हणाली “अग त्याचा अजून घर नाही म्हणजे स्थिरता नाहीये अजून. तू पुन्हा एकदा विचार कर” तशी नेहा चटकन बोलली “ अग घर काय होतच राहील. चांगला माणूस महत्त्वाचा आणि तसाही हा आईच्या नात्यातला आहे तर थोडी फार माहिती आहे”. आता ती वाट पाहणार होती त्याच्या फोनची ते ही पहिल्यांदा.
साधारण एक महिन्याने त्याने तिला संपर्क केले. तो गावी आई-बाबांना भेटायला जात होता. त्याने तिच्याकडून तिची जन्मतारीख आणि इतर माहिती घेतली. चला आता हे गाडे पुढे जातेय हे पाहून ती थोडी निश्चिंत झाली.
दोन आठवडे झाले तरी त्याच्याकडून काहीच उत्तर आले नाही. तिला वाटले कदाचित कामामुळे त्याला बोलायला वेळ नसेल. मधल्या काळात तिने त्याच्या कंपनीत नोकरीसाठी मुलाखत दिली होती आणि तिला तिथे नोकरी मिळालीही. लवकरच तिने नविन कंपनीत नोकरी सुरु केली. दोघांची कंपनी एक असली तरी वेगवेगळ्या ऑफिसमध्ये होते. एक-दोनदा त्यांची भेटही झाली होती. मधून मधून त्याचे बोलणे होत असे. त्याच्या घरी काहीतरी समस्या झाली होती. नक्की काय ते नाही सांगितलं त्याने तिला. पण त्याने तिच्याकडून थोडीशी पैशांची मदत घेतली होती. तिला तशी लग्नाची घाई नव्हती आणि त्यामुळे तिने तो विषय काढला नाही त्याच्या समोर.
दोन महिन्यानंतर ती गावी तिच्या आजोळी जत्रेसाठी गेली. त्या वेळी मात्र अंतिम निर्णय घेण्याआधी त्याची चौकशी करायचे ठरवले. माझ्या एका मैत्रिणीसाठी ह्या मुलाचे स्थळ आलेय तर तू त्यांची चौकशी करून सांग कसा मुलगा आहे ते असे तिने तिच्या मामेबाहीनीला सांगितलं. बहिणीने चौकशी केलीही. अन नेहाला सागितलं “अग त्याचा लग्न दोन-तीन महिन्याआधीच झालेय. त्याला कुणीतरी एक मुलगी आवडत होती. पण त्याची आई आणि मामाला त्याचे लग्न मामाच्या मुलीसोबत करायचे होते. याने विरोध केला होता पण तेव्हा याच्या आईला paralis चा attack आला. मग मात्र त्याने मुकाटपणे लग्न केले. तू सांग तुझ्या मैत्रिणीला तसा”.
हे ऐकून नेहाच्या पायाखालची जमिनच खचली. तिला कळतच नव्हते कि काय आणि कशी प्रतिक्रिया द्यायची ते. मुंबईला गेल्यावर ती विक्रांतशी जाब विचारायचे ठरवते कि त्याने हि गोष्ट का लपवली म्हणून.
मुंबईला आल्यावर ती सगळ्यात आधी विक्रांतला भेटते आणि सरळ विचारते “काय हो तुमचा लग्न झालेय का?” तो थोडसं दचकतो तिच्या वाक्याने. पण लगेच सावरत म्हणतो “नाही हो, विक्रांत म्हणून अजून एक मुलगा आहे गावात त्याचे झालेय लग्न.” तिला थोडा बरे वाटते. एवढे बोलून दोघे घरी जायला निघतात.
तो ट्रेनला बसवायला येतो तिला. गाडीत चढल्यावर ती निरोपासाठी त्याच्याकडे बघते. तिला जाणवते कि त्याचे डोळे पाणावलेले आहेत ते. तिच्या मनात शंकेची पाल चुकचुकते. काहीतरी गडबड आहे पण तरीही ती त्याच्यावर विश्वास ठेवायचा ठरवते. कारण त्याच्या पाणावलेले डोळे पाहून तीही थोडीशी भांबावून जाते. तिच्या लक्षात येते की या मुलाला आपण खूप आवडतोय.
घरी आल्यावर आईला ती मावशीने आणलेल्या स्थळाची आठवण करून देते. आईला सांगते “तो माझ्याच कंपनीत कामाला आहे. तू सांग मावशीला पुढची बोलणी करायला”. आईही कधी नाही ती मुलगी लग्नाचे बोलतेय म्हणून खुश होते.
एके दिवशी ऑफिसमधून आल्यावर आई नेहाला सांगते “मावशीला फोन केला होता आज. त्या मुलाचे विक्रांतचे सहा महिन्यापूर्वीच लग्न झाले आहे”.
नेहाला धक्काच बसतो. आपण मूर्ख बनलो आहोत हे लक्षात येते. पण त्याच्या लग्नाचे खर कारणही तिला ठावूक असते. ती पुरती गोंधळून जाते. याने फक्त पैश्यासाठीअसे केले का? अशीही शंका तिच्या मनात येते. ती त्याच्यात गुतंलेली नसते भावनिक दृष्ट्या. पण तरीही एक प्रकारचा लळा लागलेला असतो तिला. त्यामुळे ती त्याच्या मोहात पडत असते. तिच्या नजरेसमोर त्याचे पाणावलेले डोळे आणि त्याचे झालेलं लग्न या दोन्ही गोष्टी येत असतात. पुरती बावरून गेलेली असते ती. काय करावं, कुणाशी बोलावं काहीच कळत नसते तिला. दरम्यान त्याच्याशी तिचा बोलण चालूच असतं. त्याला कल्पनाही नसते कि नेहाला सत्य कळले आहे त्याची.
नियतीने अचानक दिलेला हा घाव... तिच्याकडे त्या क्षणी उत्तरच नसते. दोन-तीन दिवस कुणाच्याही नकळत ती खूप रडते. मनसोक्त रडून झाल्यावर तिचे मनही स्वच्छ होते. ती विचार करते. “मी कणखर आहे. जगाची फारशी पर्वा नाही करत. आणि त्याचे आहे माझ्यावर प्रेम... पण विक्रांतचे माझ्यावर कितीही प्रेम असले तरी त्याचे आता लग्न झालेलं आहे. मुळात तो अजिबात कणखर नाही. जेव्हा त्याला निर्णय घ्यायचा होता त्याने हार पत्करली. तेव्हा तो माझ्यासाठी भांडला नाही तर आता तर नाहीच नाही भांडू शकणार. मी त्याच्या अशीच संपर्कात राहिली तर कदाचित तीन किंवा त्यापेक्षा अधिक आयुष्यांची माती होईल. माझ्या बाबांना मान खाली घालयला लागेल असे मी कधीच वागू शकत नाही. असेही मी भावनिकरित्या नाही गुंतले त्याच्यात.”
तिचा निर्णय झालेला असतो... त्याच्यापासून दूर जाण्याचा. त्याच्याही नकळत, त्याला कुठल्याही प्रकारे न दुखवता हा गुंता ती सोडवायचा ठरवते... तिला निश्चितच दु:ख होणार असते. पण त्याला नियतीनेच शिक्षा केलेली असते... ती अजून काय करणार शिक्षा...
हळूहळू नेहा त्याच्याशी बोलणे कमी करते. त्याच्याही लक्षात येवू लागते तसा कि ती टाळते आहे त्याला ते. एक दिवस तो तिचे पैसे न मागताच परत करतो. त्यावेळी तो तिला सांगतो “माझ्या आईला माझ्यासाठी मामाची मुलगी पसंत आहे. आणि मामाने खूप केलेय माझ्यासाठी” तशी ती हसत बोलते “मग करा ना तुम्ही तिच्याशी लग्न... मला अजूनही माझ्या करिअरवर लक्ष केंद्रित करायचेय. तुम्हाला तुमच्या आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा... अगदी मनापासून....” तिच्या या वाक्याने विक्रांतच्या मनावरचा ताण कमी होतो. आणि दोघे एकमेकांचा हसत निरोप घेतात पुन्हा कधीही न भेटण्यासाठी...
तिला आता खात्री असते की विक्रांत आता कुठल्याही दडपणाशिवाय त्याचे आयुष्य जगेल. त्याला भ्रमात ठेवणे हेच त्याच्यासाठी योग्य असतं. कारण या घटनेत ना त्याचा दोष असतो ना तिचा. ती असते फक्त नियती...
नेहाही मग सगळा विसरून आपले नव्याने आयुष्य सुरु करते...

Tuesday, 23 January 2018

तू...

ध्यानीमनी नसतानाही
आयुष्यात आलास तू

नकळतपणे अगदी
जवळचा झालास तू

दुख-या मनावर हळूच
फुंकर घातलीस तू

डोळयांतल्या भावनांना
सराईतपणे वाचलेस तू

एका फुलापरी मजला
अलगद जपलेस तू

माझ्यातल्या खोडकरपणाला
बाहेर काढलेस तू

कौतुकाने माझ्या अल्लडतेला
दाद दिलीस तू

माझ्या चूकांनाही मोठेपणाने
माफ केलेस तू

माझा प्रत्येक हट्टही
पुरवलास तू

कळलेच नाही कधी
श्वास झालास तू

सांग कसे जगणार जर
सोबत नसशील तू

Thursday, 18 January 2018

झेप...

हरवले ते पुन्हा गवसले
गवसले ते नव्याने जाणवले

असेल का ते मोठं वादळ
कि सुखाची ती चाहूल

मार्गात असती अडचणीं कैक
पार करुयात एकामागून एक

हरवल्या होत्या आधी दिशा
शोधायची त्यांना चढली नशा

पंख झाले होते अति दुर्बळ
विश्वासाने त्यांना आलंय बळ

ठरलं सगळं अजाणता
हसू आलं आज ते कळता

धेय्य आहे फारच कठिण
पण मिळविण्या मी झटीन

कदाचित पडेन मी झडेन मी
तरीही जिद्दीने लढेन मी

आता नाही हरण्याची ही खेप
कारण घेतली जिंकण्या मी झेप...