Tuesday, April 11, 2017

माणुसकीचा उलटा प्रवास जनावराकडे...


कालपरवापर्येंत एका आमदाराने विमान कर्मचाऱ्याला मारल्याचे प्रकरण ताजे असताना, अगदी काळ-परवाच घडलेला हा प्रसंग...
सोमवारची सकाळ नेहमीच थोडी आळसावलेली आणि घाईची... ऑफिसजवळ असूनही नेहमीसारखा उशीर... रस्ता गजबजलेला... आणि माणसांची पळापळ हे नेहमीचे मुंबईचे चित्र...आणि इतक्यात एका गाडीने मोठ्याने ब्रेंक मारल्याचा आवाज आला. आवाजाच्या दिशेने पहिले तर एक साधारणतः ५० ला पोहचलेले काका त्यांची लाकडाचा उसाचा रसाचे यंत्र असलेली लाकडी गाडी चढण असलेल्या रस्तावरून चढवताना एका कारला थडकली. वास्तविक त्या काकांना पाहिल्यावर कारवाहकाने गाडी थांबवायला हवी होती. एक तर इतकी वजनदार लाकडी गाडी एक वयस्कर व्यक्ती ती स्वत: ढकलत होते. पण त्याने तसे न करता तशीच कार पुढे नेली आणि अपघात झाला.बरे अपघाताने मोठं नुकसान झाले असेही नाही लाकडी गाडी थडकून फक्त कारची प्लास्टिकची नंबरपट्टी तुटली. कार वाहक गाडी बंद करून उतरला आणि सरळ त्याने काकांच्या ४-५ कानाखाली मारल्या.

इतके करूनही तो थांबला नाही तर त्याच्याकडून पैसे मागू लागला. एक तर स्वत:ची चूक तरीही त्याची अरेरावी चालू होती. का तर ते काका गरीब होते म्हणून? कुणी दिला ह्याला स्वत:च्या वडिलांच्या वयाच्या माणसाला मारण्याचा अधिकार... साधे संवाद करून नुकसानभरपाई मागण्याचेही सौजन्य नसावे?हे सगळे घडत असताना लोक फक्त प्रेक्षकाच्या भूमिकेत होते... अगदी मीही... ऊसगाडीवाले काका अगदी हवालदिल झालेले. कसेबसे होते तितके पैसे त्यांनी त्या कारवाल्याला दिले आणि मग दोघेही आपल्या मार्गी लागले...पण या प्रसंगाने मी मात्र अस्वस्थ झालेय... माझ्या मते नुकसानभरपाई मात्र अजूनही झाली नव्हती. कारची नंबरपट्टीचे झालेलं नुकसान तर भरून दिले होते. पण काकांना मिळालेल्या ४-५ कानाखाली त्याचे काय? ती नुकसान भरपाई कोणी दिलीच नव्हती. त्यांचा झालेला अपमान आणि त्या अपमानाने झालेलं मनाचे खच्चीकरण याची भरपाई झालीच नव्हती. असं सारखं वाटत रहात की थोडी हिंमत करून मध्ये पडायला हवे होते... काकांना त्यांची नुकसान भरपाई देण्यासाठी... पण आता हळहळ व्यक्त करण्याशिवाय मी काहीच करू शकत नाही...आजकाल असे बरेच प्रसंग आजूबाजूला घडताना दिसतात... माणसे सुसंस्कृतपणा सोडून वागताना दिसतात... आणि मग प्रश्न पडतो खरच आपण प्रगती करतोय? कारण माणूस जनावरासारखे वागू लागलाय... उलट जनावरापेक्षाही हिंस्त्र आहे... जनावरे तरी भूक लागली तरच हल्ला करतात... पण उगाच कारण नसताना माणसे एकमेकांवर हल्ला करतात... कधी शरीराचा तर कधी मनाचा खून करतात... हे नक्कीच उन्नतीचे नाही तर अधोगतीचे लक्षण आहे...

No comments:

Post a Comment